Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल आज; बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
Assembly Election Results 2021 (PC - ANI)

Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्याच्या 822 विधानसभा जागांसाठी मतमोजणी रविवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल. यावेळी कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यावेळी एकूण 2364 केंद्रांवर मतमोजणी होईल. 2016 मध्ये एकूण मतमोजणी केंद्रांची संख्या 1002 होती. या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालांपैकी देशातील जनतेचे संपूर्ण लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. कारण, येथे भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये थेट स्पर्धा आहे. मतमोजणीसाठी नामांकित 822 निवडणूक अधिकारी आणि 7000 हून अधिक सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील 292 विधानसभा जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पश्चिम बंगालच्या 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले. शमशेरगंज आणि जंगीपूर या दोन जागांवर निवडणूक लढविली गेली नाही. कारण शमशेरगंज मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आणि जंगीपूर सीटवरील आरएसपीच्या उमेदवाराचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील 108 मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे बांधलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम आणि मतदार सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) वर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. (वाचा - Assembly Election Results 2021: पुदुच्चेरी, केरळ, तामिनाडू येथे 8 वाजता सुरु होणार मतमोजणी; पहा Counting Centre च्या बाहेरची दृश्ये)

मध्य प्रदेशात दामोह विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर भाजप-कॉंग्रेसचा दावा

मध्य प्रदेशमधील दमोह विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी येणार आहे. याबाबत भाजपा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी विजयाचे दावे केले आहेत. भाजपकडून असे म्हटले जात आहे की, जनता राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर शिक्कामोर्तब करेल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतमोजणीची सर्व तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे.

भाजपा मोठा विजय मिळवेल - डॉ. दीपक विजयवर्गीय

कॉंग्रेसच्या तिकिटावर दमोह येथून आमदार म्हणून निवडून आलेले राहुलसिंह लोधी यांनी राजीनामा देऊन भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यामुळे येथे पोटनिवडणुका घेण्यात आल्या. पोटनिवडणुकीत राहुल हे भाजपचे उमेदवार होते तर अजय टंडन यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती. भाजपचे मुख्य प्रवक्ते डॉ. दीपक विजयवर्गीय म्हणाले की, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या क्षणिक नाराजीमुळे ही जागा कॉंग्रेसच्या बाजूने गेली होती, परंतु येथे भाजपाला मोठा पाठिंबा आहे. भाजपा मोठा विजय मिळवेल.

कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दुर्गेश शर्मा म्हणाले की, लोकशाही वाचविण्यासाठी कॉंग्रेस ही पोटनिवडणूक लढवित आहे. ज्या पक्षाबरोबर जनतेने सहमती दर्शविली आणि मतदान केले त्या पक्षाचा विश्वासघात झाला. जनता धडा शिकवेल आणि त्याचा परिणाम काँग्रेसच्या बाजूने होईल.