प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लग्नासाठी मुलाची अथवा मुलीची मर्जी असणे किंवा त्यांच्या इच्छा विचारात घेणे का गरजेचे आहे हे दर्शवणारे उदाहरण झारखंडमध्ये (Jharkhand) घडले आहे. लग्नानंतर सासरी चाललेल्या नवरीला तिच्या प्रियकराने सर्वांच्या देखत पळवून नेल्याची घटना राजधानी रांचीच्या धुर्वा पोलीस स्थानक परिसरात घडली आहे. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, मात्र या मुलीने व तिच्या प्रियकराने आत्मसमर्पण केल्याने या कथेत नक्की काय ट्विस्ट येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा मुलगा खुंटी तर नवरी नागडी या गावाची रहिवासी आहे. रांची येथे या जोडप्याचे लग्न मोठ्या धामधुमीत पार पडले. लग्नानंतर नवरीच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरु झाला. नवऱ्याकडील मंडळी मोठ्या आनंदाने, वाजतगाजत ही वरात घेऊन परत चालले होते. अचानक या नवरीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी ही वरात थांबवली, आणि नवरीला गाडीतून बाहेर काढून तिला घेऊन जाऊ लागले. जेव्हा नवरी स्वतःहून तिच्या प्रियकराच्या गाडीवर जावून बसली तेव्हा सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कारण हा सर्व प्लान नवरी आणि तिच्या या प्रियकराने मिळून ठरवला होता. (हेही वाचा: मृत प्रियकराच्या डेड बॉडीसोबत 1 महिना राहिली महिला; वापरत होती त्याचे एटीएम कार्ड)

या सर्व प्रकारामुळे गोंधळलेल्या वरातीमध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी नवरामुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ही मुलगी व तिच्या प्रियकराने आत्मसमर्पण केले असून पोलीस अजून तपास करीत आहे.