Parliament Budget Session 2023: राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ; कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
Parliament (PC -Wikimedia Commons)

Parliament Budget Session 2023: गुरुवारी संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून भाजप काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे, तर विरोधी पक्ष अदानी मुद्द्यावर जेपीसीच्या मागणीसाठी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लंडनहून परतले आहेत. राहुल गांधी आज संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. लंडनमध्ये दिलेल्या वक्तव्यावर राहुल पत्रकारांशी बोलू शकतात, असं म्हटल जात आहे.

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याचा त्यांचा हा डाव असून आमच्या जेपीसी मागणीकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे केले जात आहे. बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा बाजूला ठेवून ते राहुल गांधींचे लोकशाहीवादी भाषण जनतेला दाखवत आहेत, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण)

दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला अडचण येत असेल तर त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, पण त्यांनी देशाची बदनामी केली तर या देशाचे नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले. रिजिजू पुढे म्हणाले की, जर कोणी देशाला शिवीगाळ केली तर हा देश त्याला कधीही माफ करणार नाही. देशातील जनतेने काँग्रेसला नाकारले असेल तर त्यात आमचा दोष नाही.

तथापी, राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे खासदार सातत्याने करत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार म्हणून राहुल यांच्या वर्तनाची विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी लोकशाही संपवण्याची भाषा करत आहेत, असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्यामुळे काँग्रेस संपत असल्याचा दावाही इराणी यांनी केला आहे.

संसदेच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही अदानी-हिंडेनबर्ग वादावर जेपीसीच्या मागणीवरून काँग्रेस आक्रमक झाली होती. त्यामुळे संसदेचे कामकाज तिसऱ्या दिवशीही सुरू होऊ शकले नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना शांत राहण्याचे आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन केले.