Drug | (Photo Credit: Archived, edited, representative images)

PM Jan Aushadhi Kendra: सर्वसामान्यांना बाजारभावापेक्षा 90 टक्क्यांपर्यंत स्वस्त औषधे देणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांचा (Jan Aushadhi Kendra) विस्तार होणार आहे. ग्रामीण भागात त्याचा विस्तार करण्यासाठी सरकार 2000 नवीन जनऔषधी केंद्रे उघडणार आहे. ग्रामीण भागात असलेल्या कृषी पतसंस्थांमध्ये ही केंद्रे सुरू केली जातील. सहकार मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, सरकारने देशभरात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी 2,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांना (PACS) मान्यता दिली आहे.

या वर्षी ऑगस्टपर्यंत सुमारे 1,000 जनऔषधी केंद्रे उघडतील, तर उर्वरित जनऔषधी केंद्रे डिसेंबरपर्यंत सुरू होतील, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सहकार मंत्री अमित शहा आणि रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्यात झालेल्या बैठकीत PACS समित्यांना जन औषधी केंद्रे उघडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा -Bihar: '3 इडियट्स' चित्रपटाप्रमाणे नर्सने डॉक्टरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे केली गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया; नर्सने कापली नस, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू)

यासाठी देशभरातून 2,000 PACS समित्यांची निवड केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे PACS सोसायट्यांचे उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी तर वाढतीलच, शिवाय लोकांना स्वस्त दरात औषधेही उपलब्ध होतील, असे सहकार मंत्रालयाने म्हटले आहे.

आतापर्यंत, देशभरात परवडणारी औषधे विकणारी 9,400 हून अधिक जनऔषधी केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांद्वारे सुमारे 1,800 औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे विकली जातात. या औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांपेक्षा 50 ते 90 टक्के कमी आहेत. जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराकडे किमान 120 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.