Union Budget 2022: अर्थसंकल्पात रेल्वेला मोठी भेट, तीन वर्षांत तयार होणार 400 नवीन 'वंदे भारत ट्रेन'
Vande Bharat trains (फोटो सौजन्य - PTI)

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, पुढील तीन वर्षांत 400 नवीन 'वंदे भारत ट्रेन' विकसित आणि तयार केल्या जातील. यासह, लहान शेतकरी आणि एमएसएमईच्या फायद्यासाठी रेल्वेकडून नवीन उत्पादने सादर केली जाणार आहेत.

येत्या तीन वर्षात या गाड्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या नवीन गाड्या स्टीलऐवजी हलक्या वजनाच्या अॅल्युमिनियमच्या बनवल्या जाणार आहेत, ज्या प्रत्येकी 50 टन हलक्या असतील. याचा फायदा असा होईल की, या गाड्या अतिशय कमी ऊर्जेवर चालतील. मात्र, या गाड्या कधी सुरू होणार हे अर्थमंत्र्यांनी सांगितलेले नाही. (वाचा - Union Budget 2022: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कपडे, बूटांसह 'या' वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर)

दरम्यान, सध्या देशातील काही मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. त्यांनी सांगितलं की, लहान शेतकरी आणि मध्यम उद्योगांसाठी रेल्वे नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा विकसित करेल.

स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा साखळींना मदत करण्यासाठी एक स्टेशन एक प्रोडक्ट लोकप्रिय केले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून 2022-23 मध्ये 'कवच' अंतर्गत सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी 2,000 किमी नेटवर्क स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत 100 PM गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स मल्टी-मॉडल लॉजिस्टिक सुविधांसाठी विकसित केले जातील.