Bengaluru: बेंगळुरू पोलिसांनी अलीकडेच शहरातील विविध भागातून प्रीमियम सिल्क साड्या चोरल्याच्या आरोपाखाली पकडलेल्या टोळीतील चार महिलांना अटक केली आहे. 25 ऑगस्ट रोजी जेपी नगर येथील एका दुकानातून साड्या चोरणारी टोळी रंगेहात पकडली गेली होती आणि पोलिसांनी त्यांच्याकडून 17.5 लाख रुपये किमतीच्या 38 साड्या जप्त केल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील आणखी दोन महिला अद्याप फरार आहेत. या महागड्या साड्या चोरून बाजारात स्वस्त दरात विकण्याचा कट आरोपींनी आखला होता. हे देखील वाचा: Emergency चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कंगनाला धक्का
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी साडी परिधान केलेल्या सहा महिला जेपी नगर येथील एका सिल्कच्या दुकानात ग्राहक म्हणून गेल्या होत्या. यातील चार महिलांनी दुकानदाराला कपडे दाखवण्यास भाग पाडले, तर उर्वरित महिलांनी शांतपणे टेबलावरील आठ महागड्या साड्या उचलून घटनास्थळावरून पळ काढला.
दोन महिला अचानक तेथून पळून गेल्याने दुकानदाराला संशय आला. उरलेल्या चार महिला, ज्यांनी आधीच 10 पेक्षा जास्त साड्या कपड्यांखाली लपवल्या होत्या, त्या दुकानातून निघू लागल्या, तेव्हा दुकानदाराने त्यांना अडवले. त्यांची तपासणी केली असता चोरीच्या साड्या जप्त करण्यात आल्या. यानंतर दुकानदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी अतिशय हुशारीने दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून ही चोरी केली. या घटनेने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, विशेषत: ज्या दुकानांमध्ये महागडे कपडे आणि साड्या विकल्या जातात. पोलीस आता आणखी दोन फरार महिलांचा शोध घेत असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी आशा आहे.