Afghanistan-Taliban Conflict: आज काबुलहून 24 भारतीय आणि 11 नेपाळी लोकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीसाठी रवाना

संकटग्रस्त अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकन सैन्य (American military) मागे घेण्याच्या 31 ऑगस्टच्या मुदतीपूर्वी आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या जोरदार प्रयत्नांमध्ये भारताने लष्करी विमानाने काबूलमधून (Kabul) सुमारे 180 लोकांना परत आणण्याची गुरुवारी आशा व्यक्त केली आहे. मात्र आता 180 लोक विमानाने परतणार नाहीत. आज काबुलमधून 24 भारतीय आणि 11 नेपाळी लोकांसह भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले आहे. कारण तालिबानने (Taliban) अफगाण नागरिकांना तेथे थांबवले आहे. भारतात येणारे हे विमान दुपारच्या सुमारास दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढले जात आहे, त्यात भारतीय आणि अनेक अफगाणिस्तान शीख आणि हिंदू यांचा समावेश आहे.

15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी पकडल्यानंतर काबूलमधील झपाट्याने बिघडत असलेली सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने 'ऑपरेशन देवी शक्ती' या आपल्या मोहिमेअंतर्गत 800 पेक्षा जास्त लोकांना आधीच परत आणले आहे. ट्विट करून माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून 24 भारतीय आणि 11 नेपाळी लोकांसह उड्डाण केले आहे आणि ते दिल्लीच्या मार्गावर आहे. तालिबानच्या क्रूरतेच्या भीतीने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत हजारो अफगाणी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ काबूल विमानतळाभोवती जमले आहेत.

बुधवारी अनेक G-7 नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना अमेरिकन सैन्य मागे घेण्याची 31 ऑगस्टची मुदत वाढवण्याची विनंती केली. मात्र बिडेन म्हणाले की, अमेरिका वेळेवर सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि इतर अनेक मित्र देशांच्या समन्वयाने भारत निर्वासन कार्य करत आहे. हेही वाचा Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्थानात महागाईचा भडका, पाण्याची बाटलीची किंमत 3000 रुपये तर राईस प्लेट 7500 रुपये, अफगाणी नागरिक झालेत त्रस्त

अलीकडेच अफगाणिस्तानातून 78 लोकांना भारतात परत आणण्यात आले आहे. या प्रवाशांमध्ये 25 भारतीयांचाही समावेश आहे. याशिवाय काही अफगाणिस्तान शीख, हिंदू यांचाही त्यात समावेश आहे. 16 ऑगस्टपासून एकूण 800 लोकांना परत आणण्यात आले आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी भारताने पहिल्या तुकडीला विमानाने हलवले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिन्केन म्हणाले की, लष्करी विमानातून अमेरिकनांना बाहेर काढण्यासाठी 12 दिवसांची मोहीम असूनही अफगाणिस्तानमध्ये अजूनही सुमारे 1,500 अमेरिकन शिल्लक आहेत, असा प्रशासनाचा विश्वास आहे. तालिबान 14 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये पोहचल्यापासून दिवस-रात्र ऑपरेशनमध्ये 4,500 अमेरिकन लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ब्लिन्केन म्हणाले की अमेरिकन अधिकारी सुमारे 500 अमेरिकन लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्लिन्केन म्हणाले की आणखी 1,000 पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.