Nirmala Sitharaman On Adani Enterprises: देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून अदानी एंटरप्रायझेसच्या वादाचा यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी स्पष्ट केलं आहे. अर्थसंकल्पासंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात निर्मला सितारामन म्हणाल्या, नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक वर्ष 24 च्या अर्थसंकल्पाचा मुख्य भर विकासावर आहे. अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात वित्तीय एकत्रीकरण आणि वाढ या दोन्हीकडे समान लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्यात समतोल राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, विकास हा आपल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. आम्हाला ती पुनर्प्राप्ती कायम ठेवायची आहे. विकासाचे श्रेय देशातील जनतेला आहे. देशाला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मदत आणि धोरणात्मक उपायांचा अवलंब सर्वसामान्य जनतेने केला. (हेही वाचा -Gautam Adani Net Worth: जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर; किती आहे संपत्ती? जाणून घ्या)
सार्वजनिक भांडवली खर्चावर अधिक पैसा खर्च करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेनुसार हा अर्थसंकल्प असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळेच या अंतर्गत 10 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. अदानी एफपीओ मागे घेतल्याने जागतिक वित्तीय बाजारपेठेतील भारताची स्थिती कमकुवत झाली आहे का, असे विचारले असता अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 2 दिवसांत परकीय चलन साठा $8 अब्ज (US$) ने वाढला आहे. आपल्या स्थूल आर्थिक मूलभूत तत्त्वांवर किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
सीतारामन यांनी पुढे बोलताना सांगितले की, एफपीओ येतात आणि जातात. हे चढ-उतार प्रत्येक मार्केटमध्ये होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही दिवसांत आपल्याला 8 अब्ज मिळाले आहेत. यावरून भारताविषयीची धारणा आणि त्याच्या अंगभूत शक्तीला बळ मिळाले आहे. नियामक संस्था त्यांचे काम चोख करत आहेत. आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्याआधी बँका आणि एलआयसीने अदानी समुहाशी आपले एक्सपोजर उघड केले आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, बाजार नियामक संस्था त्यांचे काम चोखपणे करत आहेत जेणेकरून मार्केटचे नियमन चांगले होईल. बाजाराचे नियमन चांगले ठेवण्यासाठी सेबी आपले प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा सामना करण्यासाठी त्याच्याकडे सर्व मार्ग आहेत.