Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

Uttar Pradesh: गाझियाबाद (Ghaziabad) च्या सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरातील राजनगर विस्तार क्षेत्रातील पॉश व्हीव्हीआयपी सोसायटीत अत्यंत दु:खत घटना घडली आहे. या सोसायटीमध्ये 14 व्या मजल्यावरून खाली पडून एका 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इमारतीतील लोकांनी या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तेजस्व चरण, असं या मृत मुलाचं नाव आहे. तेजस्व हा गाझियाबादमधील एका शाळेत एलकेजी वर्गात शिकत होता. तेजस्व आपल्या पालकांसह राजनगर क्षेत्रातील व्हीव्हीआयपी पॉश सोसायटीच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होता. (हेही वाचा -  Andhra Pradesh: 2250 रुपयांच्या पेंशनसाठी 92 वर्षीय वृद्धाने केली पत्नीची हत्या)

दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई ही एक नर्स म्हणून काम करते. तर मुलाचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. तेजस्वचे वडील सध्या कोरोनामुळे घरून काम करत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी तेजस्वची आई कामावर गेलेली होती. तसेच वडील तेजस्वने सांगितलेली खाण्याची वस्तू आणण्यासाठी दुकानात गेले होते. तेजस्वने बाथरूममधून एक स्टूल उचलून तो फ्लॅटच्या बाल्कनीत आणून ठेवला. स्टूलवर चढून तो खाली पाहत होता. यावेळी तेजस्वचा स्टूलवरून तोल गेला आणि तो 14 व्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताचं सोसायटीतील नागरिकांनी खाली धाव घेतली आणि मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेमुळे तेजस्वच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.