न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे रुळावरुन घसरले ((Photo Credit : ANI)

न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे रुळावरुन घसरल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे हा अपघात बुधवारी (१० ऑक्टोबर) घडला. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तात या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलाचाही समावेश आहे. जखमींचा एकूण आकडा समजू शकला नाही. रायबरेली येथील हरचंदपूर स्टेशनजवळ हा अपघात घडला. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांचे पथक बचाव आणि मदतकार्य करत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरचंदपूर येथून ५० मीटर अंतरावर न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे रुळावरुन घसरले. या घटनेनंतर परिसरात अफवांचे पेव फुटले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्राण वाचविण्यासाठी प्रवासी मिळेल त्या ठिकाणाहून सैरावैरा धावू लागले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरु केले. रेल्वे,पोलीस प्रशानालाही स्थानिकांनी घटनेची माहिती दिली. ही गाडी मालदाहून रायबरेली मार्गे दिल्लीला निघाली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, स्थानिक अधिकारी, एनडीआरएफच्या अधिकारी आणि प्रशासनाला योग्य ती मदत करण्यास सांगितले आहे.