मृत्यूचे सत्र सुरूच; राजकोट-अहमदाबाद येथे डिसेंबरमध्ये 2019 मध्ये 219 मुले दगावली, रुग्णालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

देशात एकीकडे थंडीत वाढ होत असताना, सरकारी रुग्णालयांची (Government Hospital) दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) डिसेंबर या एकाच महिन्यात 110 मुलांच्या मृत्यूनंतर, बिकानेरमधील पीबीएम हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत 162 मुलांचा मृत्यू झाला. आता राजस्थाननंतर गुजरातच्या (Gujrat) शासकीय रुग्णालयात मुलांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. आहे प्राप्त माहितीनुसार, मागील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलमध्ये 85 मुलांचा मृत्यू झाला, तर राजकोटमध्ये एका महिन्यात 134 मुलांचा मृत्यू झाला. म्हणजेच गेल्या एक महिन्यात या दोन रुग्णालयात 219 नवजात मुलांचा मृत्यू झाला आहे.

डिसेंबर 2019 मध्ये गुजरातमध्ये 85 मुलांचा मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये 74 तर ऑक्टोबरमध्ये 94 मुलांचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर राजकोटच्या चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका वर्षात 1235 मुलांचा मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूबद्दल अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर गुणवंत राठौर सांगतात, 'दरमहा 400 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल होतात, त्यानुसार मृत्यूचे प्रमाण 20 टक्के आहे. येथे सुविधांचा अभाव आहे, खासगी रुग्णालये व इतर सरकारी रुग्णालयातील मुलांना गंभीर अवस्थेत सरकारी रुग्णालयात पाठविले जाते. अशा परिस्थितीत मुलांच्या मृत्यूचा डेटा फक्त सरकारी रूग्णालयातच दिसून येतो. दरमहा 400 मुलांना रुग्णालयात दाखल केले जाते, त्यातील 80 टक्के मुले निरोगी आहेत.' (हेही वाचा: कोटा येथील हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात तब्बल 102 मुलांचा मृत्यू; विरोधी पक्षाने चढवला राज्य सरकारवर हल्ला)

दुसरीकडे, मुलांचे पालक या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षाला दोष देत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने स्वतः विधानसभेत कबूल केले आहे की, सन 2019 पर्यंत 1,41,142 मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत. आदिवासी भागात कुपोषणाची स्थिती अधिक वाईट आहे. दाहोद व नर्मदा हे जिल्हा कुपोषणाने सर्वाधिक त्रस्त आहेत. दाहोदमधील कुपोषित बालकांची संख्या 14,191 आहे, तर नर्मदा जिल्ह्यात 12,673 मुले कुपोषित आहेत.