धक्कादायक! तरुणाला बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात; अचानक ट्रिगर दाबल्याने गमवावा लागला जीव
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Rajasthan: धौलपूर जिल्ह्यात एका तरुणाला बेकायदेशीर देशी बनावटीच्या बंदुकीसोबत सेल्फी काढणं चांगलचं महागात पडलं आहे. हा तरुण आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकण्यासाठी बंदुकीसोबत सेल्फी काढत होता. मात्र, अचानक बंदुकीचा ट्रिगरवर दाबल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी शवविच्छेदन करून तरुणाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

हे प्रकरण बारी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेह गावातील आहे. 19 वर्षीय सचिन मीणा मित्रांसह शेतात मोहरी काढण्यासाठी गेला होता. त्यानंतर तरुणाच्या मनात विचार आला आणि त्याने अवैध शस्त्र काढून मोबाईलसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. अचानक देशी कट्ट्याचा ट्रिगर दाबला गेला आणि एक गोळी निघून त्याच्या डोक्यात गेली. (वाचा - Suicide: पप्पा मला स्मृतीभ्रंश आहे, मी वाचतो ते लक्षात राहत नाही म्हणत नववीच्या मुलाची आत्महत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शेजारी उभ्या असलेल्या तरुणांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच कुटुंबीय शेतात पोहोचले. त्यांनी युवकाला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर पोलिस ठाण्याचे एएसआय सत्यप्रकाश यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाकडून एका तरुणाने गोळी झाडल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयाच्या शवागारात नेला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.