Himachal Pradesh Bus Accident (PC - ANI)

Himachal Pradesh Bus Accident: हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील कुल्लू जिल्ह्यातील (Kullu District) सेंज (Sainj Valley) येथे सोमवारी सकाळी एका खासगी बसला अपघात झाला. बसमधील 16 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जंगला गावाजवळ बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांमध्ये किमान 6 शाळकरी मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खूपच खराब आहे. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुल्लू जिल्ह्यातील निओली-शंशेर रस्त्यावर खासगी बसचे नियंत्रण सुटले आणि सैंज व्हॅलीच्या जंगल परिसरात 200 मीटर खोल दरीत बस कोसळली. बसचा स्फोट झाला. अपघात स्थळ जिल्हा मुख्यालयापासून 65 किमी अंतरावर आहे. (हेही वाचा - PM Modi Andhra Pradesh Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर, स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजूंच्या 30 फूट उंच कांस्य पुतळ्याचे करणार अनावरण)

या अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुल्लूचे एसपी गौरवचंद शर्मा यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. बचाव पथक येण्यापूर्वीच स्थानिक लोकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, "हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या वेळी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की, जखमी लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे.” पंतप्रधानांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

अपघातावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, प्रशासन घटनास्थळी असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “कुल्लूच्या सेंज व्हॅलीमध्ये खासगी बस अपघाताची दुःखद बातमी समजली. संपूर्ण प्रशासन घटनास्थळी आहे, जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. ईश्वर या घटनेतील मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना शक्ती देवो.