Ganesh Visarjan 2022: गणेश विसर्जनाला देशात अनेक ठिकाणी गालबोट; उत्तर प्रदेश आणि हरियाणात गणरायाचं विसर्जन करताना 15 जणांचा बुडून मृत्यू
Ganesh Visarjan | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Twitter)

Ganesh Visarjan 2022: दहा दिवस चाललेल्या गणेश चतुर्थी उत्सवाची शुक्रवारी सांगता झाली. शुक्रवारी सर्वत्र गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) करताना बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणात वेगवेगळ्या घटनांमध्ये काल गणेश विसर्जनाच्या वेळी बुडून 15 जणांचा मृत्यू झाला. हरियाणातील महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन सुरू असताना बुडून सहा जणांचा मृत्यू झाला.

महेंद्रगडमध्ये कालव्यात चार तरुण बुडाले, तर सोनीपतमध्ये यमुना नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला. महेंद्रगडमध्ये विसर्जनासाठी सात फूट मूर्ती घेऊन जाणारा समूह कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नऊ तरुण वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर इतरांना वाचवण्यात यश आले. (हेही वाचा - 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' म्हणत अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी Amit Thackeray मनसे नेत्यांसह पोहचले दादर चौपाटीवर किनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेवर)

महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्या वेळी बुडून अनेकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक असल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणाली की, "या कठीण काळात आम्ही सर्व मृतांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. एनडीआरएफच्या टीमने अनेकांना बुडण्यापासून वाचवले आहे. मी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो,"

उत्तर प्रदेशात 9 जणांचा मृत्यू -

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये गणेश विसर्जन दरम्यान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. उन्नावमध्ये तीन, संत कबीर नगरमध्ये चार, ललितपूरमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला.

उन्नावमध्ये तीन मुलांचा मृत्यू -

उन्नावमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिसऱ्या मुलाला मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुले गंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गेली होती. यादरम्यान पाच मुले गंगा नदीत बुडू लागली. याशिवाय संत कबीरनगरमध्ये आमी नदीत बुडून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पूजा साहित्याचे विसर्जन करण्यासाठी ही मुले नदीकाठावर गेली होती. ते सर्वजण अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडाले. त्यानंतर गोताखोरांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू -

उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला वाचवताना तलावात उडी मारणाऱ्या मुस्लिम तरुणाचाही मृत्यू झाला.