Meena Deshpande (Photo Credits: Twitter)

सुप्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे (Meena Deshpande) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या मीना देशपांडे यांचे अमेरिकेत उपचारादरम्यान निधन झाले. मीना देशपांडे या थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. त्यांच्या जाण्याची बातमी कवी-लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन दिली. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मीना देशपांडे यांच्या निधनाची बातमी कळताच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

'साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणाऱ्या प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. साहित्य व कादंबरी लेखनात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे' असे अनिल देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे ‘अश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा-कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची करोनासोबतची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.