मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन
यशवंत भालकर (संग्रहित - संपादित प्रतिमा)

नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड यांसारख्या तबल 13 चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे मराठी दिग्दर्शक यशवंत भालकर (Yashwant Bhalkar) यांचे आज सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने हे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूरमधील प्रसिद्ध जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. तसेच यशवंत भालकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते.

नुकतेच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. कोल्हापूरची शान रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त होणे तसेच, तो वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. अलिकडील पाच, सहा वर्षे ते रंकाळा बचाव आंदोलनाचे आघाडीचे कार्यकर्ते बनले होते.