
लॉकडाउन काळात थंडावलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. यातच मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरांनी (Chain Snatching) पळ काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता मालपेकर या मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील बाकड्यावर बसल्या होत्या. त्यावेळी एक भामटा वेळ विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरून पसार झाला. यात सविता मालपेकर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता मालपेकर या सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क येथे फेरफटका मारायला आल्या होत्या. त्यानंतर त्या पार्कमधील बाकड्यावर बसले. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्यांना वेळ विचारला. मात्र, सविता यांनी त्याला वेळ सांगण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर काहीवेळातच त्या व्यक्तीने सविता यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार झाला. त्यावेळी सविता यांनी आरडाओरड केली, त्यानंतर आजूबाजुचे लोक जमले. मात्र, तोपर्यंत भामटा पळून गेला. हे देखील वाचा- Riteish Deshmukh आगामी मराठी थ्रिलर सिनेमा Adrushya मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत; मंजिरी फडणीस, पुष्कर जोग प्रमुख भूमिकेत
दरम्यान, शिवाजी पार्क येथे केवळ मुख्य प्रवेशद्वाराजवळच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. यावर सविता मालपेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचे ठिकाण आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही. सर्व प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणातील सोनसाखळी चोराचा पोलिसांनी शोध लावला असून तो माहिम येथील रहिवाशी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. या संदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.