Photo Credit- X

Raj Kundra Summoned By ED: राज कुंद्राच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी (Raj Kundra Pornography Case)समन्स बजावले आहे. या प्रकरणी राज यांना ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. राज कुंद्रा यांना पुढील आठवड्यात ईडीच्या(ED) चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. पॉर्नोग्राफी आणि ॲडल्ट फिल्म्सच्या चित्रीकरणासंबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शनिवारी राज कुंद्रा यांना समन्स बजावले. यापूर्वी ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये जवळपास 15 ठिकाणी छापे टाकले होते. यात राज कुंद्राच्याही कार्यलयांचा आणि घराचा समावेश होता.

त्यांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर राज कुंद्रा यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. 'पत्नी शिल्पा शेट्टीला या प्रकरणात ओढू नका, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले होते. त्यांनी लिहिलं होतं- 'त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब असू शकते, सध्या सुरू असलेल्या तपासात मी पूर्ण सहकार्य करत आहे. अश्लील मजकूर आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित दावे सत्य घटनेवर परिणाम करणार नाहीत - न्याय होईल! अशा प्रकरणांमध्ये माझ्या पत्नीचे नाव वारंवार ओढणे खपवून घेतले जाणार नाही. कृपया मर्यादेचा आदर करा.'

काय प्रकरण आहे?

राज कुंद्राशी संबंधित हे प्रकरण मे 2022 चे आहे. जेव्हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या आणि इतर साथीदारांविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाही ईडीने क्रिप्टो करन्सी प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 98 कोटीxची मालमत्ता जप्त केली होती. मात्र, नंतर जोडप्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला.