
बॉलिवूडनंतर आता हॉलीवूडवर आपला ठसा उमटवणारी, क्वांटिको (Quantico) नंतर घरा घरा पोहोचलेली, जवळजवळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय टॉकशोमध्ये हजेरी लावणारी, फॅशन इंडस्ट्रीमध्येही आपला जलवा बिखरनारी, मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता एका नव्या विक्रमामुळे चर्चेत आहे. नुकतेच प्रियंकाचे इंस्टाग्रामवर (Instagram) 40 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. इतके फॉलोअर्स असणारे ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. प्रियंका ही फक्त भारतातीलच नाही तर, संपूर्ण जगात सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या 50 लोकांमधील आशियातील एकमेव व्यक्ती ठरली आहे.
याबाबत प्रियंकाने एक फोटोसह पोस्ट टाकून माहिती दिली आहे, त्यावर फक्त 40 M असा आकडा लिहीला आहे. या पोस्टसोबत प्रियंका तिच्या चाहत्यांचे आभार मानायलाही विसरली नाही. प्रियांकाच्या हॉलिवूड एन्ट्रीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. तसेच आपली पर्सनल, प्रोफेशनल लाईफ, विविध लुक्स, कपडे, फॅशन अशा विविधांगी गोष्टींचे फोटोज ती इंस्टावर पोस्ट करत असते अशा गोष्टीही चाहत्यांना आकर्षित करतात.
दरम्यान, याबाबत प्रियंकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा आकडा असाच वाढत राहो, अशी अनेक चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. नुकतेच प्रियंका मेट गालाच्या लुकमुळे चर्चेत होती. अनेकांनी तिच्या या लुकची खिल्ली उडवली मात्र तिच्या चाहत्यांना तिचा हा लुक आवडला. काहीही असो, सध्या तिचे फॉलोअर्स पाहता चांगल्या पद्धतीने असो वा वाईट पद्धतीने असो प्रियंका किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो.