मोहम्मद अझिज (Photo credit: File Photos)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज (Mohammed Aziz) यांची आज (मंगळवार) प्राणज्योत मालवली, ते 64 वर्षांचे होते. त्यांची मुलगी सना हिने या मृत्यूची बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद अझिज हे काल कोलकात्यात होते, कार्यक्रम आटोपून ते मंगळवारी मुंबईला परतले. मात्र दुपारी 3 च्या दरम्यान एअरपोर्टवरून घरी परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्या मुलीला बोलावून घेतले. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता, हॉस्पीटलने हृदयविकाराचा झटका हे कारण सांगून त्यांना मृत घोषित केले.

मोहम्मद अझिज यांचा जन्म 2 जुलै 1954 रोजी कोलकाता येथे झाला. अझिज यांनी बॉलिवूडसोबतच उडिया आणि हिंदी चित्रपटांसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. 'ज्योती' या बंगाली चित्रपटामधून अझिज यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 1984 सालचा 'अंबर' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. अमिताभ बच्चन यांच्या मर्द चित्रपटातील ‘मै मर्द टांगेवाला’ (Mard Taangewala) या गाण्यामुळे अझिज रातोरात स्टार बनले होते.

मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत पार्श्वगायन केले. तर ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘मैं से मीना से न साकी’, 'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', यांसारखी सुपरहिट गीते दिली.