रणवीर सिंह और दीपिका पादुकोण (Photo Credits: Yogen Shah)

ज्या लग्नाची तमाम चाहत्यांना उत्सुकता होती, ते दीप-वीरचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. अगदी मोजक्याच लोकांच्या सानिध्यात या लग्नाचा सोहळा रंगला. या लग्नातील फक्त दोनच छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती, त्यावरूनच दीपिकाच्या चुनरी पासून ते रणवीरच्या मुंडावळ्या पर्यंत सर्व गोष्टींचे कौतुक झाले. आता दीपिका आणि रणवीर लग्न आटोपून भारतात परत आले आहेत. मात्र या लग्नातील एका प्रथेबद्दल नवा वाद उद्भवला आहे. दीप-वीरच्या ‘आनंद कारज’ पद्धतीप्रमाणे झालेल्या या लग्नातील एका विधीवर आक्षेप घेतला जात आहे.

14 आणि 15 नोव्हेंबर रोजी दीपिका आणि रणवीर इटली येथे विवाहबंधनात अडकले. यांचा कोंकणी आणि सिख अशा दोन प्रकारे विवाह संपन्न झाला. सिख पद्धतीच्या लग्नामध्ये ‘आनंद कारज’ या विधीनुसार रणवीर-दीपिकाला गुरुद्वारामध्ये जाणे भाग होते. पण त्यांनी तसे न करता विवाहस्थळीच गुरु ग्रंथ साहिब आणले. याच बाबतील इटलीमधील शीख समुदाय आता आक्रमक झाला आहे. शीख धर्मीयांकडून पवित्र मानले जाणारे गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर नेले जात नाही. म्हणूनच याची तक्रार भारतातील ‘अकाल तख्त’कडे केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजूनतरी यावर दीपिका आणि रणवीरने आपले मत व्यक्त केले नाही. त्यामुळे या वादाला तोंड फुटते का हा वाद शांत होतो ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

आनंद कारज ही हिंदू रितीरिवाजांपासून थोडी वेगळी पद्धती आहे. आनंद कारज म्हणजे ‘आनंदाचे कार्य’. यामध्ये शुभ वेळ, शुभ मुहूर्त, लग्न घटिका, इतर विधी अशा गोष्टींना जास्त महत्व दिले जात नाही. दोन प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र येण्यासाठी कोणतीही वेळ ही शुभ आहे असे या विधी मागचा समज आहे. या पद्धतीमध्ये गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या महाग्रंथाचे पठण केले जाते, आणि धर्मगुरुच्या आस्थेच्या बळावरच आनंद कारजमध्ये म्हणजे शीख संस्कृतीत लग्नगाठ बांधली जाते.