Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

'व्हाय आय किल्ड गांधी' (Why I Killed Gandhi) नावाच्या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे नथूराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका करणार आहेत. त्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध करत त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेताही आहेत. आतापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या या सर्वच भूमिकांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. दरम्यान, आता मात्र डॉ. अमोल कोल्हे हे नथूराम गोडसे यांची भूमिका साकारत असल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवाती काँग्रेस पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह अनेकांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांच्यावर टीकाही होते आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, 'पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका,'

डॉ. कोल्हे यांचा 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट येत्या महिना अखेरीस ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना चित्रपटाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी पक्षाचे नेते शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल राजकीय मंडळींकडून उपस्थित केला जातो आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्येच झाले होते. तेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो. तसेच, आपण एखादी भूमिका साकारतो म्हणून ती भूमिका वैचारिक पातळीवर स्वीकारली असे होत नाही. काही वेळा आपण एखाद्या विचारांशी, भूमिकेशी सहमत नसतो. मात्र, त्या भूमिका आव्हानात्मक असतात. त्यामुळे कलाकार ती भूमिका करत असतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्या भूमिकाचा संबंध राजकीय विचारांशी जोडू नये, असे अवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा विरोध

डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे-शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमोल कोल्हे आणि त्यांनी साकारलेल्या नथूरामच्या भूमिकेबाबत बोलताना म्हटले की, अमोल कोल्हे यांच्या त्या भूमिकेकडे केवळ अभिनय आणि कलेच्या दृष्टीनेच पाहावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही संमिश्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कलाकार म्हणून कोणतीही भूमिका साकारण्यास आपण त्याला बंधन घालू नये. कोल्हे यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल आकस असेल असे वाटत नाही. शेवटी कोल्हे हे शरद पोंक्षे नव्हेत असेही मिठकरी म्हणाले.