Vishu Marathi Movie: गश्मिर महाजनी आणि मृण्मयी गोडबोलेच्या 'विशू'चा ट्रेलर प्रदर्शित
Vishu Marathi Movie (Photo Credit - Insta)

ये मालवण कहा आया? यहा दिल में... असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ 'विशू' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसतेय. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार करणारा आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आरवीच्या येण्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. विशूच्या अस्थिरतेला 'ती'चा किनारा मिळेल? 'विशू' नक्की कोण आहे ? आजवर लपलेले सत्य 'विशू'ला कळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'विशू' पाहिल्यावर मिळणार आहेत.

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनशैलींचे दर्शन 'विशू'मध्ये घडत आहे. काँक्रीटच्या जंगलात माणूसपण हरवलेले लोक आणि गावात आजही माणुसकी जपणारे, मनापासून पाहुणचार करणारे लोक दिसत आहेत. निळाशार समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि तिथली डौलदार घरे असे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि कर्णमधुर वाटणारी मालवणी भाषा 'विशू'मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येकालाच आपल्या गावची आठवण करून देणारा 'विशू' ८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

'विशू'बद्दल दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, '' शहरात राहूनही आपल्या गावाशी नाळ जोडणाऱ्या तरुणाची ही कहाणी आहे. दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात. तेव्हा त्यांचा प्रवास कोणत्या किनाऱ्यावर येऊन थांबतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तरुणाईलाही हा चित्रपट आवडेल. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम साकारली आहे. गश्मीर आणि मृण्मयी ही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकत आहे. कामानिमित्त मुंबईत आलेला तरुण वर्ग आपल्या गावची भाषा, संस्कृती, राहणीमान विसरत चालला आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावाविषयी ओढ निर्माण होईल.''

तर गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले म्हणतात, '' कॉर्पोरेट जगात वावरताना आपली मूळ संस्कृती मागे पडू लागली आहे. आपण पाश्च्यात्यांचे अनुकरण करू लागलो आहोत. स्पर्धेच्या युगात पळताना कुठेतरी माणूस म्हणून आपण हरवत चाललो आहोत आणि ही माणुसकी जपायची असेल तर आपली संस्कृती जपली जाणे तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश अतिशय हलक्या -फुलक्या पद्धतीने 'विशू'च्या माध्यमातून देण्यात आला आहे.'' (हे देखील वाचा: Baipan Bhari Deva: केदार शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर सोशल मीडियावर शेअर)

या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'विशू'चे संवाद, पटकथा हृषिकेश कोळी यांची असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. 'विशू'चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.