RaanBaazaar Trailer: वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
RaanBaazaar Trailer (Photo Credit - Social Media)

वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' (RaanBaazaar) ही वेबसीरिजचा (Web Series) 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 18 मे रोजी म्हणजेच नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejashwini Pandit) ट्रेलरमध्ये झळकत आहे.  प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या दोंघीच्या ऐवजी अनेक कलाकार ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या ट्रेलर मध्ये सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मंकरद अनासपुरे, उर्मिला कोठारे, मोहन जोशी आणि अभिजीत पानसे इत्यादी कलाकार पाहायला मिळणार आहे.

'रानबाजार' वेब सीरिज संदर्भात दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणाले, "आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॉन्टेन्ट आहे. तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षयला वाटला. मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली.

यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी 'रानबाजार' पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे." (हे देखील वाचा: Thech: प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, ‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच)

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या 20 मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.