प्रेम ते असतं, जे ह्रदयात दाटतं आणि प्रेम ते नसतं, जे फक्त डोळ्यात वसतं. प्रेमाची व्याख्या बदलणाऱ्या या ‘समरेणू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून महेश डोंगरे दिग्दर्शित व एम आर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत ‘हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मंगाडे व भरत लिमण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय...’ या टॅगलाईनमधूनच कळतेय की, सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीत जबरदस्त ट्विस्ट असणार आहे. सम्या आणि रेणूमध्ये हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी काही कारणास्तव एका वेगळ्याच वळणावर गेल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यांच्या या प्रेमकहाणीत संत्या त्यांना वेगळे करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रयत्नात तो यशस्वी होणार का? या प्रेम त्रिकोणात रेणू दोघांपैकी नक्की कोणाचा स्वीकार करणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
‘समरेणू’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, “ ‘समरेणू’ या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमाचा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करताना दडपणही होते आणि काहीतरी चांगले प्रेक्षकांना देतोय, याचा आनंदी होता. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली आहे. आमची ही मेहनत लवकरच तुमच्या समोर येईल. या चित्रपटाला दर्जेदार संगीत लाभले आहे. विनाकारण गाण्यांचा समावेश न करता प्रत्येक गाणे कथानकाला पुढे घेऊन जाणारे आहे. आतापर्यंत गाण्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” (हे देखील वाचा: Bhonga Movie Trailer: 'भोंगा' धार्मिक नाही तर सामाजिक समस्या, 'भोंगा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित)
या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एम आर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.