
नवरात्रीचा (Navratri) उत्सव हा नवदुर्गेी पूजाअर्चा करण्यासाठी तिचा जागर घालण्यासाठी सर्वत्र साजरा केला जातो. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून अनेक ठिकाणी घटस्थापना केली जात आहे. अशा चैतन्य आणि आनंदी वातावरणात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आपल्या फोटोच्या माध्यमातून PPE किट मध्ये दडलेल्या देवीचे दर्शन घडवले आहे. या फोटोमध्ये तेजस्विनीने देवीचा अवतार धारण केला असून यावर्षी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामुळे देवी आपल्याला कोणत्या रुपात भेटायला आली याची महती सांगितली आहे.
या फोटोमध्ये तेजस्विनीने देवीचा अवतार धारण करून PPE किट घातले आहे. ज्यामुळे PPE किट मधील महिला डॉक्टर या देवीचे रुपच आहे अशी तेजस्विनी या फोटोमधून सांगत आहे.
या फोटोखाली 'प्रतिपदा : दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला…अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला…घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस, आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस' अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने शेअर केली आहे.
तेजस्विनीचा हा अवतार पाहून तिच्या चाहत्यांनी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच या फोटोमागची कल्पना देखील सर्वांना प्रचंड आवडली आहे. तेजस्विनी गेली 3 वर्षे नवरात्री निमित्त अशा फोटोमधून सुंदर सामाजिक संकल्पना लोकांसमोर घेऊन येत आहे.