यंदा 92 वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे रंगणार आहे. नुकतीच अरूणा ढेरे यांची यंदाच्या मराठी साहित्य संमेलनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अध्यक्षांच्या नावाची चर्चा असतानाच दिग्दर्शक सचिन कुंडलकरने शेअर केलेल्या फेसबूक पोस्टमुळे वातावरण पुन्हा तापायला सुरूवात झाली आहे.
साहित्य आणि विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी, ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ म्हणून एकेकाळी गाजणारी मराठी साहित्य संमेलनं आणि वादामुळेच अनेकदा चर्चेत असतात. साहित्य संमेलनातील राजकारण, वाद विवाद यामुळे रसिकांनीही याकडे पाठ फिरवली आहे. सचिन कुंडलकरांनी उपहासात्मक टीका करताना,मराठी साहित्य संमेलनासारख्या २००० वर्षे आउटडेटेड आणि खर्चिक टाईमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली कि केस काळे करावेत , दारू सोडावी , व्यायाम सुरु करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करून घ्याव्यात . आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. what the f*** फिलिंग . कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पहायची सवय होती' असे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ कलाकार विजय चव्हाणांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यावेळेस सचिन कुंडलकरांनी व्यक्त केलेल्या भावनांवरूनही मराठी कलाकारांमध्ये चांगलीच जुंपली होती. आता पुन्हा कठोर शब्दात सचिन कुंडलकरांनी आपली मत सोशल मीडियावर व्यक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षीपासून निवडणुकीऐवजी एकमताने, सन्मानाने अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार संमेलनानिमित्त अध्यक्षपदाचा मान मिळवणाऱ्या त्या 5व्या महिला लेखिका ठरल्या आहेत. 18 वर्षांनी हा मान एका महिला लेखिकेला मिळाला आहे.