'ठाकरे' सिनेमामधून सचिन खेडेकरचा आवाज गायब,  तुम्ही ऐकली का 'Thackeray' ची नवी झलक
Thackeray Movie (Photo credits: YouTube)

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांचा जीवनपट 'ठाकरे' (Thackeray) या सिनेमातून रूपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. सुरूवातीला सेन्सॉरच्या कचाट्यात अडकलेला 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर (Thackeray Trailer)  लॉन्च तर झाला पण बाळासाहेबांना देण्यात आलेला आवाज त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला शोभत नसल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर प्रेक्षकांच्या नाराजीची दखल घेत ठाकरे सिनेमामधील बाळासाहेबांचा आवाज बदलण्यात आला आहे. पूर्वी अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar)  याचा आवाज बाळासाहेबांना देण्यात आला होता मात्र सध्या युट्युबवर असलेल्या ट्रेलरमध्ये नवा आणि अधिक चपखल आवाज ऐकू येत आहे. Thackeray Song Aaya Re Thackeray: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शान दाखवणारे 'आया रे ठाकरे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बाळासाहेबांचा आवाज बदलला ?

बाळासाहेब ठाकरे यांची ओळख म्हणजे त्यांचं वकृत्त्व होतं. त्यामुळे त्यांच्या आवाजातील करारीपणा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या अभिनयाला जुळून येत नसल्याने अनेक प्रेक्षकांनी तक्रार केली होती. सध्या 'ठाकरे' सिनेमाच्या मराठी ट्रेलर तसेच ' आपले साहेब ठाकरे..' या गाण्यामधील बाळासाहेबांच्या भाषणाच्या सिनमध्येदेखील आवाज बदलल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

बाळासाहेबांना नवा आवाज देणारा कलाकार कोण? याबद्दल सिनेमा निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र मीडीया रिपोर्टनुसार आणि वर्तवलेल्या अंदांजांनुसार हा आवाज प्रसिद्ध व्हॉईस आर्टीस्ट  चेतन शशितल (Chetan Shashital) यांचा असण्याची शक्यता आहे. 'ठाकरे' हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमाची निर्मिती संजय राऊत यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा मात्र अभिजीत पानसे यांनी सांभाळली आहे.