'आयुष्यावर बोलू काही...' कार्यक्रमाचा अपमान असल्याचंं सांगत Girlz Poster चा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून निषेध
Saleel Kulkerni (Photo Credits: Facebook)

विशाल देवरूखकर दिग्दर्शित आगामी 'गर्ल्स' सिनेमाचं पोस्टर (Girlz Poster) आज (10 ऑक्टोबर)  रीलिज झालं आहे. बोल्ड अंदाजातील सिनेमाचं पोस्टर आज सकाळपासूनच चर्चेमध्ये आहे. मात्र या सिनेमातील मुख्य पात्र साकारणार्‍या अंकिता लांडेंच्या पोस्टरवरून संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त केला आहे. अंकिताच्या टी शर्टवर 'आयुष्यावर बोलू काही.. FamilySucks' असं लिहलेलं आहे. यासोबतच अंकिता काही असभ्य इशारे करताना दिसत आहे. यावरून सलील कुलकर्णीने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून आपला निषेध व्यक्त केला आहे.

सलील कुलकर्णी यांच्या कविता वाचनाच्या एका कार्यक्रमाचं नाव 'आयुष्यावर बोलू काही' असं आहे. मागील 16 वर्ष सलील कुलकर्णीसह त्यांच्या चमूने देशा-परदेशात कार्यक्रम केले आहेत. गर्ल्स पोस्टरवर लिहलेला मेसेज पाहून हा 'आपल्या कार्यक्रमाचा अपमान असल्याचं' मत सलील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: बॉईज नंतर आता कहर करायला येत आहेत 'गर्ल्स', बोल्ड मराठी चित्रपटांच्या यादीत नव्या नावाची भरती

सलील कुलकर्णी यांची पोस्ट 

गर्ल्स चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या 29 नोव्हेंबरला रीलिज होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट चर्चेत आला आहे.