मुलींना पटवणे ही काही साधीसुदी गोष्ट नाही हे जगजाहीर आहे. सध्याच्या काळात मुलींच्या मागण्या इतक्या असतात की त्या पूर्ण करता करता मुलांची अगदी दमछाक उडून जाते. अशा मुलींना इम्प्रेस करणे ही सोपी गोष्ट नसते. अशाच एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी नवनवे फंडे वापरताना दिसणार आहेत प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि पार्थ भालेराव (Parth Bhalerao). त्यांचा आगामी चित्रपट 'डॉक्टर डॉक्टर' (Doctor Doctor) मधून. या चित्रपटातील एक धमाकेदार गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'माझाच पाहिजे' (Mazach Pahije) असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात प्रथमेश आणि पार्थने धमाल उडवून दिली आहे. येत्या 30 ऑक्टोबरला झीप्लेक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या धमाकेदार गाण्यातून मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात पार्थ आणि प्रथमेशची उडालेली धावपळ व त्यांचा अनोखा अंदाज पहायला मिळतोय. वैभव लोंढे व राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेलं हे गाणं कौस्तुभ गायकवाड व वैभव लोंढे यांनी गायलं आहे. हे गाणं वैभव लोंढे यांनी संगीतबद्ध केलं आहे.
या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांनी केली आहे. अमोल कागणे हे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर आहेत. चित्रपटाचे लेखन सागर पाठक व प्रीतम एस.के.पाटील यांचे आहे. प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांची धमाल प्रत्येकाला खळखळून हसायला लावणार आहे.
या चित्रपटात प्रथमेश आणि पार्थ भालेराव सह रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, अमोल कागणे आदि कलाकार झळकणार आहेत. झीप्लेक्सवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 99 रुपये मोजावे लागणार आहेत. डॉक्टर डॉक्टर हा झीप्लेक्सवर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे.