Naal Marathi Movie:  'नाळ' सिनेमाचा पहिल्याच आठवड्यात कमाईचा विक्रम!
नाळ सिनेमा (Photo Credit : Youtube)

Naal Marathi Movie Box Office Collection : मराठी सिनेमांचे नशीब पालटले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. सुबोध भावेच्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमानंतर अजून एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. नागराज मंजुळे अभिनयीत 'नाळ' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

पहिल्या आठवड्यात 'नाळ' सिनेमाने तब्बल 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 16 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेत्री देविका दफ्तरदार, दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळे आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर 'जाऊ द्या ना वं' या गाण्यातील चैत्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडले. त्यामुळे चैत्याचे भावविश्व आणि आई-मुलाचे नाते यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाची नाळ थेट प्रेक्षकांची जोडली गेली आहे.

झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' संस्थेने एकत्रितपणे नाळ सिनेमाची निर्मिती केली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर संवादाची जबाबदारी नागराज मंजुळेंनी सांभाळली आहे.