सध्या बॉलिवूडकरांना मराठी सिनेसृष्टीची भुरळ पडली असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार तसेच दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांची निर्मिती सुरु केली आहे. अगदी प्रियंका चोपड़ा पासून करण जोहर ने मराठीत आपले नशीब आजमावलेले असून त्यात आता वर्णी लागलीय ती अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt). 'बाबा' (Baba) असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले होते.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये वडील आणि मुलामधील नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मुकबधीर मुलाला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावा यासाठी हे वडील सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याला शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी, लहान लहान गोष्टींमधील आनंद मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात.
काही दिवसापूर्वी संजयने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली होती. हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.
राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दीपक डोबरियाल, नंदिता पाटकर, आयर्न एम, चित्तरंजन जी, स्पृहा जोशी आणि अभिजीत के. प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.