Aathwa Rang Premacha: पडद्यावर उलगडणार 'आठवा रंग प्रेमाचा', रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी मिळणार पाहायला
Aathwa Rang Premacha (Photo Credit - Instagram)

चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित "आठवा रंग प्रेमाचा" (Aathwa Rang Premacha) हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद (Vishal Anand) ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. अटॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरू सोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

समीर कर्णिक यांनी "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला पगला दिवाना", "चार दिन की चांदनी", "हिरोज", "नन्हे जैसलमेर" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे. (हे देखील वाचा: Eka Haatach Antar: प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला)

"आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे. अतिशय रंजक असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांवर भूल पाडेल यात शंका नाही.