सुनील शेट्टी साकारत आहे Hollywood च्या चित्रपटात मुख्य भूमिका; हैद्राबाद येथे सुरु झाले शुटींग, पहा डीटेल्स
सुनील शेट्टी (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आता हॉलिवूडमध्ये (Hollywood) डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांमधील सुनील शेट्टीचे काम कमी झाले होते. आता सुनीलने हॉलिवूड चित्रपट 'कॉल सेंटर' (Call Center) साईन केला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात सुनील मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटात तो एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका सकारात आहे. हा चित्रपट कॉल सेंटरशी निगडीत खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. या चित्रपट संदर्भातील सुनील शेट्टीच्या लुकचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाची कहाणी एका भारतीय पोलिस कर्मचाऱ्याची आहे, जो कॉल सेंटरमध्ये होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीचा पर्दाफाश करतो. अमेरिकन-चिनी चित्रपट निर्माते जेफ्री चिन (Jeffery Chin) हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबाद येथे सुरु झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सुनील शेट्टी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल. हा चित्रपट इंग्रजी भाषेत तयार केला जात आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेतही डब केला जाईल. या चित्रपटात सुनील शेट्टीचे काही अ‍ॅक्शन सीन्सही पाहायला मिळणार आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे यांच्या समर्थनात संजय दत्त, सुनील शेट्टी, दिनु मोरियासह एकवटले हे बॉलिवूड कलाकार)

दरम्यान, नुकतेच सुनील शेट्टीने कन्नड सिनेसृष्टीत ‘पहलवान’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. या चित्रपटात त्यांनी किच्चा सुदीपच्या गुतुची भूमिका साकारली होती. तसेच पुढच्या वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या रजनीकांत अभिनीत तमिळ चित्रपट ‘दरबार’ मध्ये तो दिसणार आहे. सोबतच पुढच्या वर्षी 19 मार्चला प्रदर्शित होणार्‍या मोहनलाल स्टारर मल्याळम चित्रपट, 'मराकर: द लायन ऑफ अरेबियन सी' (Marakkar: The Lion of the Arabian Sea) मध्येही त्याने महत्वाची भूमिका साकारली आहे.