Kim Kardashian ची तिसऱ्या घटस्फोटाची तयारी; लग्नाच्या 6 वर्षानंतर Kanye West पासून वेगळे होण्यासाठी दाखल केला अर्ज
Rapper Kanye West With Kim Kardashian | (Photo Credits: Instagram)

हॉलिवूड स्टार किम कर्दाशियन (Kim Kardashian) लवकरच तिचा नवरा अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टशी (Kanye West) घटस्फोट घेणार आहे. अहवालानुसार, दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून गोष्टी बिघडत चालल्या आहेत. दोघेही गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वतंत्र राहत होते. किमने घटस्फोट प्रकरणात लॉस एंजेलिसचे प्रसिद्ध वकील लॉरा वसार यांच्याही बोलणे केल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. आता किमने कान्ये वेस्टशी लग्नाच्या 7 वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाविषयी बातम्या येत होत्या. रिपोर्टनुसार, 40 वर्षीय किम बर्‍याच दिवसांपासून आपल्या चार मुलांसमवेत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. तर 43 वर्षीय कान्ये वेस्ट व्हायमिंगमध्ये आपल्या फॉर्म हाऊसमध्ये राहत आहे.

तिच्या घटस्फोटाच्या अर्जात किमने आपल्या 4 मुलांच्या जॉइंट कस्टडीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. किम आणि कान्ये यांनी 2012 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी इटलीमध्ये त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले. यानंतर हे दाम्पत्य सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहे. या जोडप्याला 4 मुले आहेत ज्यात 7 आणि ३ वर्षांच्या दोन मुली व  5 वर्षे आणि 21 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. (हेही वाचा: WWE स्टार John Cena अडकला विवाहबंधनात; जाणून घ्या पत्नी Shay Shariatzadeh बद्दल काही खास गोष्टी)

रिपोर्टनुसार किमने स्वत: कान्येपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. किम तिचे बार परीक्षा आणि वकील होण्यासाठी खूपच गंभीर असल्याने हा निर्णय घेतायाचे सांगितले जात आहे. किम तिच्या तुरूंग सुधार अभियानाबद्दलही गंभीर आहे. दरम्यान, कान्ये वेस्टचा हा पहिला घटस्फोट आहे , तर यापूर्वी 2 वेळा किमचा घटस्फोट झाला आहे. किमने कान्येला घटस्फोट दिल्यास डेमन थॉमस आणि ख्रिस हम्फ्रीजनंतर हा तिचा तिसरा घटस्फोट असेल.