हॉलिवूड स्टार Al Pacino वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा होणार पिता; 29 वर्षीय गर्लफ्रेंड Noor Al Falah गर्भवती
Al Pacino (Photo Credits: Getty Images)

हॉलिवूड स्टार, अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते अल्फ्रेडो जेम्स उर्फ ​​अल पचिनो (Al Pacino) चौथ्यांदा वडील होणार आहेत. सध्या ते 83 वर्षांचे आहेत. टीएमझेडच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याची 29 वर्षीय मैत्रीण नूर अल्फल्लाह (Noor Al Falah) आठ महिन्यांची गर्भवती आहे. पचिनोच्या व्यवस्थापकानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अल पचिनो आणि नूर अलफल्लाह एप्रिल 2022 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 'पेज सिक्स' सूत्रांनुसार, हे जोडपे कोविड-19 साथीच्या महामारीपासून गुपचूप डेटिंग करत असल्याचे उघड झाले आहे.

त्यांच्या रोमान्सबद्दलच्या अफवा पहिल्यांदा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा ते पहिल्यांदा एकत्र डिनर करताना क्लिक झाले होते. स्त्रोताने खुलासा केला, अल पचिनो आणि नूर यांनी साथीच्या आजारादरम्यान डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि सध्या या दोघांचे नाते उत्तम चालू आहे. नूरची डिलिव्हरी जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला नियोजित आहे.

पचिनोला आधीच त्यांची माजी प्रेयसी, अभिनय प्रशिक्षक जॅन टेरंटसोबत ज्युली मेरी नावाची 33 वर्षांची मुलगी आहे. यासह अजून एक माजी प्रेयसी बेव्हरली डी'एंजेलोसह 22 वर्षीय अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुले आहेत. पचिनोने 2008-18 मध्ये लुसिला पोलॅकला देखील डेट केले होते. याआधी 2014 च्या एका मुलाखतीत अल पचिनोने पितृत्वावर मोकळेपणाने भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, मी माझ्या मुलांसाठी जबाबदार आहे. मी त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यांच्याजवळ मी नसणे ही माझ्यासाठी त्रासदायक बाब आहे.' (हेही वाचा: Avatar The Way Of Water: 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीत होणार रिलीज)

दरम्यान, क्लासिक द गॉडफादर मालिकेतील स्टार अल पचिनोने 'स्कारफेस', 'सेंट ऑफ अ वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', 'द डेव्हिल्स अॅडव्होकेट', 'द इनसाइडर', 'कार्लिटोज वे', 'डॉनी ब्रास्को', 'ओशन्स थर्टीन' अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.