Friends: The Reunion Time and Date: मोठी बातमी! भारतामध्ये Zee5 वर प्रसारित होणार 'फ्रेंड्स: द रीयूनियन'; जाणून कधी व कसे पाहू शकाल
Friends Reunion (Photo Credit : Instagram)

‘फ्रेंड्स’ (Friends) हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांपैकी एक आहे. 17 वर्षे झाली हा शो संपून मात्र अजूनही या शोचे भूत चाहत्यांच्या मनावरून उतरले नाही. आता एका विशेष भागाद्वारे या शोचे रियुनिअन होणार आहे. जेव्हापासून ही बातमी आली आहे तेव्हापासून फ्रेंड्सचे चाहते उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहत आहेत. 'फ्रेंड्स: द रीयूनियन' (Friends: The Reunion) एचबीओ मॅक्सवर (HBO Max) 27 मे रोजी प्रसारित होईल. मात्र एचबीओ मॅक्स भारतात दिसत नसल्याने इथल्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला होता. आता अशा लोकांसाठी चांगली बातमी आहे. नुकतेच भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 (Zee5) ने जाहीर केले आहे की, ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ त्यांच्या व्यासपीठावर प्रसारित केला जाणार आहे.

फ्रेंड्स एक सिटकॉम आहे जो, डेव्हिड क्रेन (David Crane) आणि मार्टा कॉफमन (Marta Kauffman) यांनी निर्मित केला होता. एनबीसी वर 22 सप्टेंबर 1994 ते 6 मे 2004 पर्यंत हा प्रसारित झाला होता. या सिरीजचे दहा सिझन झाले असून एकूण 236 एपिसोड प्रसारित झाले आहेत. जेनिफर एनिस्टन (Jennifer Aniston), कोर्टनी कॉक्स (Courteney Cox), लिसा कुड्रो (Lisa Kudrow), मॅट लेब्लांक (Matt LeBlanc), मॅथ्यू पेरी (Matthew Perry) आणि डेव्हिड श्विमर (David Schwimmer) अशा सहा कलाकारांनी 6 मित्रांची भूमिका साकारली होती.

अनेकांसाठी फ्रेंड्स हा फक्त शो नसून ती एक भावना आहे. कित्येकांचे आयुष्य फ्रेंड्समुळे बदलले आहे. अगदी ‘मैत्रीची कदर’ पासून इंग्रजी भाषा शिकण्यापर्यंत फ्रेंड्सने लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. तर असे हे 6 मित्र 'फ्रेंड्स: द रीयूनियन' द्वारे पुन्हा भेटीला येत आहेत. या नव्या एपिसोडचा प्रोमो आल्यापासून एचबीओ मॅक्सव्यतिरिक्त हा शो भारतामध्ये कसा आणि कुठे पाहिला जाऊ शकतो याबाबत चर्चा होती. मात्र आता झी5 ने ही समस्या दूर केली आहे.

झी5 ने मंगळवारी जाहीर केले की, अपेक्षित फ्रेंड्स रीयूनियन विशेष भाग गुरुवार, 27 मे रोजी दुपारी 12.32 वाजता आपल्या व्यासपीठावर प्रसारित होणार आहे. हा विशेष भाग पाहण्यासाठी पाहण्यासाठी आपल्याला झी5 प्रीमियमची सदस्यता घ्यावी लागेल ज्याची किंमत वार्षिक 499 आहे. होय, सध्या झी 5 वर फक्त वार्षिक सदस्यत्व उपलब्ध आहे.