
'द रॉक' (The Rock) या नावाने लोकप्रिय असलेला डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार, हॉलीवुड अभिनेता ड्वेन जॉन्सनला (Dwayne Johnson) कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली होती. त्याच्या बरोबरच त्याची पत्नी आणि मुली यांचेही कोरोना विषाणू अहवालही पॉझिटिव्ह झाले होते. 11 मिनिटांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्टमध्ये स्वतः ड्वेनने ही माहिती दिली. तो म्हणाला की, साधारण दोन-अडीच आठवड्यांपूर्वी तो, त्याची पत्नी लॉरेन आणि त्याच्या 4 व 2 वर्षांच्या मुली जस्मीन आणि टियाना यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र हे कुटुंब नक्की कसे संक्रमित झाले याबाबत ड्वेनला काही कल्पना नाही.
व्हिडिओमध्ये ड्वेन म्हणतो, ‘कुटुंब म्हणून आपल्याला कधीही सहन करावे लागणारी ही सर्वात कठीण परिस्थिती आहे. व्यक्तिशः, हे माझ्यासाठीदेखील खूप आव्हानात्मक होते, जे मी गेल्या काही दिवसांत सहन केले. माझे प्रथम प्राधान्य म्हणजे माझे कुटुंब आणि माझ्या प्रिय लोकांना वाचवणे हे आहे. कदाचित फक्त मलाच कोरोना विषाणूची लागण झाली असती तर बरे झाले असते.’
पहा व्हिडीओ -
पुढे ड्वेन म्हणतो, ‘कोरोना विषाणू हा इतर कोणत्याही रोगांपेक्षा अतिशय वेगळा आहे. इतर अनेक छोटे मोठे अपघात, जखमा अशा गोष्टींपेक्षा ही गोष्ट फार निराळी आहे.’ त्यानंतर ड्वेनने सांगितले की, जवळजवळ तीन आठवड्यानंतर ड्वेन व त्याचे कुटुंब ठीक झाले आहेत, आता ते निरोगी आहेत व त्यांच्यापासून इतरांना संक्रमणाचा कोणताही धोका नाही. ड्वेनने आपल्या पोस्टमध्ये स्वतःच्या अनुभवांवरून काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये तो म्हणतो - शिस्तबद्ध रहा, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, निरोगी राहण्याचा प्रयत्न करा, नेहमी मास्क परिधान करा, आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक रहा.
दरम्यान, हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनची भारतातही बरीच लोकप्रियता आहे. भारतात त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोईंग आहे. ड्वेनने 'द मम्मी रिटर्न्स', 'जर्नी 2: द मिस्टीरियस आयलँड', 'हरक्यूलिस', 'स्निच', 'मोआना', 'फास्ट अँड फ्युरियस प्रेझेंट: हॉब्ज अँड शो' सारख्या हिट प्रकल्पात काम केले. नुकताच त्याच्या आगामी ‘ब्लॅक अॅडम’ चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला.