मोठा गाजावाजा करून, प्रमोशन, प्रसिद्धी यासाठी तुफान पैसा खर्च करून ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ (Thugs of hindustan)ला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. मात्र प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर निघाला’ प्रकारचा ठरला. आमीर खान आणि बिग बी अशी दोन मातब्बर मंडळी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली. याच गोष्टीमुळे थिएटरच्या मालकांनाही आपली चांदी होईल असे वाटले होते. मात्र सुजाण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णतः पाठ फिरवली. उलट या चित्रपटावरील विनोद, मिम्स यांनीच प्रेक्षकांचे जास्त मनोरंजन केले.
ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने थिएटरच्या मालकांना फार मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. आमीरचा चित्रपट म्हणून मोठ्या हौसेने थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो लागले, मात्र या चित्रपटासोबत थिएटरच्या मालकांच्याही पदरी अपयश आले. म्हणूनच आता थिएटर मालक नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे वृत्त आहे.
तब्बल 275 कोटींचा खर्च करून बनवलेला हा चित्रपट 500 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा होती, मात्र 10 दिवसांत या चित्रपटाचे कलेक्शन हे फक्त 143 करोड इतके आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. म्हणूनच आता थिएटर मालक आपले पैसे परत मागत आहेत. यापूर्वी ‘ट्यूबलाईट’ फ्लॉप झाल्यानंतर याचा तोटा वितरकांना होऊ नये म्हणून सलमानने 55 कोटी रुपये परत केले होते. आता यावर आमीर खान आणि निर्माते काय निर्णय घेतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.