सर्वात श्रीमंत महिला अभिनेत्रींमध्ये Deepika Padukone ठरली अव्वल; जाणून घ्या 2018 मधील तिची कमाई
दीपिका पदुकोन (Photo credit : Facebook)

आपले प्रेमप्रकरण, लग्न यांमुळे 2018 मध्ये दीपिका पदुकोन (Deepika Padukone) चा बोलबाला होता. सर्वात चर्चेत राहिलेल्या कलाकारांपैकी ती एक होती. आता वर्षाच्या शेवटीही दीपिका एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. फोर्ब्स (Forbes) मासिकाने नुकतीच श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. आश्चर्य म्हणजे या यादीत महिला कलाकारांमध्ये दीपिका पदुकोनचे नाव अग्रस्थानी आहे. दीपिकाची 2018 मधली कमाई 112.80 कोटी आहे. या यादीमध्ये दीपिकाने आमिर खान, अमिताभ बच्चन आणि शाहरुख यांनाही मागे टाकले आहे. मागच्या वर्षी दीपिकाची कमाई 60 करोड इतकी होती. यावर्षी त्यात जवळजवळ दुप्पटीने वाढ झाली आहे.

दीपिकाचा पद्मावत यावर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला फार मोठे यश मिळवून दिली. आर्थिकदृष्ट्याही या चित्रपटाचा दीपिकाला प्रचंड फायदा झाला. या चित्रपटाने जवळजवळ 600 करोड रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटासाठी दीपिकाला रणबीर आणि शाहीद यांच्यापेक्षाही जास्त मानधन देण्यात आले होते. सध्या दीपिका एका चित्रपटासाठी कमीत कमी 10 करोड रुपये घेते.

या यादीमध्ये महिलांमध्ये दीपिकानंतर नंबर लागतो तो आलियाचा. 58.83 कोटी इतक्या कमाईसह ती 12व्या स्थानी आहे. त्यानंतर अनुष्का शर्मा 16 वी (45.83 कोटी), कतरिना कैफ 21वी (33.67 कोटी), प्रियांका चोप्रा 49वी (18 कोटी) यांचा नंबर लागतो. सर्वसाधारणपणे सलमान खान या यादीत पहिल्या क्रमांकावर असून, शाहरुख आलिया नंतर 13 व्या स्थानावर आहे.

दीपिकाचे पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, रामलीला, ये जवानी है दिवानी हे सहा सिनेमे 100 कोटींच्या घरात गेले आहेत. आता तिने मेघना गुलजारचा ‘छपाक' सिनेमा साईन केला असून, 2019 मध्ये तो प्रदर्शित होईल.