कोणाचे नशीब कसे बदलेल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियामुळे (Social Media) घराघरात, गावागावात असलेले टॅलेंट देखील समोर येत आहे. यात तरुणांसोबत आता ज्येष्ठ नागरिकांच्या कलेला देखील दाद मिळत आहे. हीच दाद मिळवणा-या वॉरियर आजी शांता पवार (Warrior Aaji Shanta Pawar) यांचे स्वप्न गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर साकार झाले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यास देवदूत ठरला तो अभिनेता सोनू सूद (Sonu Sood). सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या आजीबाईंची लाठीबाजी पाहून सोनू हैराण झाला आणि कोरोनाच्या काळात सुद्धा रस्त्यावर लाठीबाजी करणा-या या वॉरियर आजींना स्वत:चे प्रशिक्षण केंद्र सुरु करुन देण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने आपला शब्द पाळला. आणि गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर शांताबाईंचे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. विरल बयाणीने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या प्रशिक्षण केंद्राला वॉरियर आजींनी 'सोनू सूद मार्शल आर्ट' असे नाव दिले आहे. Viralbhayani ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये 'आपण एक स्वप्न बघितले जे सोनू सूद मुळे पूर्ण झाले. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्राला मी त्याचे नाव देत आहे' असे वॉरियर आजींनी सांगितले आहे. सोनू सूदने आपला शब्द पाळला; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु होणार पुण्यातील Warrior Aaji शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर
वॉरियर आजींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 जुलै रोजी सोनू सूदने ट्वीट करत विचारणा केली होती की ‘कृपया या आजींचा तपशील मिळू शकेल का? या आजींच्या सोबत मला एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे, जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षणाचे धडे देऊ शकतील.’त्यानुसार हे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे.