माधुरी दीक्षित (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिची जबरदस्त फिल्मी इनिंग खेळल्यानंतर आता डिजिटलच्या जगात पाऊल ठेवत आहे. माधुरीच्या 'द फेम गेम' (The Fame Game) या वेबसिरीजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या वेबसिरीजमध्ये माधुरी अनामिका आनंदच्या भूमिकेत दिसणार आहे. काही काळापूर्वी निर्माता करण जोहरने एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये माधुरीसोबत मानव कौल आणि संजय कपूर देखील दिसले होते. माधुरी दीक्षितच्या या डेब्यू शोचे नाव आधी 'फाइंडिंग अनामिका' होते, ते आता 'द फेम गेम' असे बदलले आहे.

धर्माटिक एंटरटेनमेंटच्या या सिरीजची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. रवीना टंडन, सैफ अली खान आणि मनोज बाजपेयी यांसारख्या अनेक स्टार्सनंतर आता माधुरीही ओटीटीच्या जगात पाऊल ठेवत आहे, त्यामुळे या सिरीजबाबत तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 'द फेम गेम' 25 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. माधुरी दीक्षितची 'द फेम गेम' ही एका बॉलिवूड अभिनेत्रीची कथा आहे, जिचे आयुष्य तिच्या चाहत्यांना परफेक्ट दिसते पण तिच्या आयुष्यात अनेक काळी सत्ये आहेत.

माधुरी दीक्षितच्या 'राजा' चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटात ती संजय कपूरसोबत दिसली होती. आता पुन्हा एकदा ती संजय कपूरसोबत 'द फेम गेम'मध्ये दिसणार आहे. या दोघांशिवाय या सिरीजमध्ये मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी यांच्याही भूमिका आहेत. 'द फेम गेम'ची तांत्रिक टीम खूपच मजबूत दिसत आहे. ही सिरीज श्री राव यांनी लिहिली आहे आणि त्याच्या दिग्दर्शकांमध्ये करिश्मा कोहली व्यतिरिक्त बेजॉय नांबियारचे नाव आहे.

(हेही वाचा: प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटात उलगडणार शिवसैनिक आनंद दिघे यांचा जीवनपट; पहा मोशन पोस्टर)

दरम्यान, बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना माधुरीचा अभिनय पहायला मिळणार आहे. माधुरी रिअॅलिटी शोमध्ये वरचेवर दिसत आहे. माधुरी शेवटचे डान्स दिवाने शोमध्ये जज म्हणून दिसली होती. माधुरीचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘कलंक’ हा होता. आता सिरीजद्वारे माधुरीचे चाहते ओटीटीवर तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.