देशातील मानाचा असा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (Dadasaheb Phalke International Film Festival Awards) हा 20 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई (Mumbai) येथे होणार आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी वृत्तसंस्थेता एएनआयला याबाबत माहिती दिली. याबाबत ते म्हणाले, ‘हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांच्या कार्यक्रमाची तारीख आम्ही 20 फेब्रुवारी निश्चित केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘2020 वर्षे हे आपल्या सर्वांसाठीच फार कठीण होते. आता मी आणि माझी टीम या महोत्सवाद्वारे उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा शो नक्कीच उत्कृष्ट होईल.’ 2012 मध्ये अनिल मिश्रा यांनी स्थापित केलेला हा पुरस्कार देशातील एक महत्वाचा सिनेमा सन्मान म्हणून गणला जातो. राज्यपाल, सेलिब्रेटी, प्रतिनिधी, उद्योगपती आणि माध्यमांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडतो. अत्यंत सर्जनशील कलाकार, निर्माते, फिल्ममेकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे जीवन कारकीर्दीत उद्युक्त करण्यासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे एक अनन्य व्यासपीठ आहे.
DPIFF हा, भारतीय सिनेमाचे जनक- दादासाहेब फाळके यांचा वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने होत असलेला भारतातील एकमेव स्वतंत्र पुरस्कार आहे. दरम्यान, याआधी संस्थेने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार सुशांतसिंह राजपूतला प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2021 ने गौरविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.