
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) सीबीआयने दोन क्लोजर रिपोर्ट दाखल केले आहेत. या अहवालांमध्ये, अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात कोणताही कट रचल्याचा आरोप नाकारण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची घटना 14 जून 2020 रोजी घडली. यावेळी तो मुंबईतील त्याच्या बांद्रा येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला. मुंबई पोलिसांनी सुरुवातीच्या तपासणीत आत्महत्येचा निष्कर्ष काढला होता, ज्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालात झाली. यामध्ये मृत्यूचे कारण लटकल्यामुळे श्वास गुदमरल्याचे म्हटले होते.
सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट:
राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनेलपर्यंत, सुशांत प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. त्याच्या कुटुंबाने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आरोप केले. यानंतर, बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. आता सीबीआयने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. जेव्हा तपास यंत्रणेला कोणतेही ठोस पुरावे सापडत नाहीत तेव्हा क्लोजर रिपोर्ट दाखल केला जातो. पण याचा अर्थ असा नाही की हे प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.
जाणून घ्या पुढे काय:
जर न्यायालयाला तपास अपूर्ण वाटला तर ते अतिरिक्त तपासाचे आदेश देऊ शकते. तक्रारदाराला निषेध याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, ज्यामुळे तपास पुन्हा सुरू होऊ शकतो. जर न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला तर खटला बंद मानला जाईल. सुशांतच्या वडिलांनी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या आधारे पहिला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, तर दुसरा रिपोर्ट अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सादर करण्यात आला आहे.
सीबीआयने केली 2 प्रकरणांची चौकशी:
सीबीआयने दोन वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी केली. पहिला खटला सुशांतचे वडील केके सिंग यांनी पाटणा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. या प्रकरणात, केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता. तर दुसरा खटला रिया चक्रवर्तीने वांद्रे येथील सुशांतच्या बहिणींविरुद्ध दाखल केला होता. या प्रकरणात, सुशांतच्या बहिणींवर दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांत सिंगला औषधे दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात, रिया चक्रवर्तीने आरोप केला होता की, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू या औषधांच्या चुकीच्या प्रिस्क्रिप्शननंतर पाच दिवसांनी झाला. (हेही वाचा: Kunal Kamra Song on Eknath Shinde: कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद; FIR दाखल, संतप्त शिवसैनिकांनी हॉटेल आणि स्टुडिओची केली तोडफोड)
आढळले नाहीत कोणतेही पुरावे:
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तज्ञांचे मत, गुन्ह्याच्या ठिकाणाचे विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे सीबीआय असा निष्कर्ष काढला आहे की, सुशांत सिंगला कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडले या आरोपाचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. तसेच अहवालानुसार, गुन्हेगारी कट किंवा हत्येचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. दरम्यान, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी क्लोजर रिपोर्टचे कौतुक केले आहे आणि सर्व बाजूंनी प्रकरणाची कसून चौकशी केल्याबद्दल, सीबीआयचे आभार मानले आहेत. मानशिंदे यांनी भविष्यातील शक्यतांबद्दल सांगितले की, जर पीडितेच्या कुटुंबाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नाही, तर ते त्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. क्लोजर रिपोर्ट ऐकल्यानंतर आणि त्यावर विचार केल्यानंतर न्यायालय तो स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते आणि पुढील चौकशीचे आदेश देऊ शकते.