सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने केलेल्या कॉल डिटेल्सच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, गेल्या एका वर्षात रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतला केवळ 142 वेळा फोन केला होता, तर तिने तिच्या स्टाफला तब्बल 502 वेळा कॉल केला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रियाचे गेल्या एका वर्षातील कॉल डीटेल्स समोर आले आहेत. या दरम्यान रिया आपल्या भावाशी फोनवर 886 वेळा बोलली आहे, तर आपल्या आईला तिने 890 वेळा कॉल केला होता.
रियाने आपल्या वडिलांना 1122 वेळा कॉल केला आहे. महेश भट्टशी रियाचे 16 वेळा बोलणे झाले आहे. या कॉल डीटेल्समधून हे देखील उघड झाले आहे की, रियाने सुशांतच्या सेक्रेटरीशी 148 वेळा फोनवर बोलणे केले आहे. पटनामध्ये रिया समवेत ज्या लोकांबाबत गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्यासोबत गेल्या एक वर्षात रियाचे अनेकवेळा बोलणे झाले आहे. रिया सुशांतच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करीत होती हे रियाच्या या कॉल डिटेलवरून स्पष्ट झाले आहे, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या कॉल डीटेल्समधून अजून एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे रिया मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्याही संपर्कात होती.
बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला रिया चक्रवर्ती फरार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. पांडे यांनी 5 ऑगस्ट रोजी सांगितले होते की, रिया मुंबई पोलिसांशी संपर्कात होती, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही.'. आता रियाच्या कॉल डीटेल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, रिया अभिषेक त्रिमुखे, डीसीपी झोन, मुंबई, यांच्या संपर्कात होती. जून ते जुलै दरम्यान वांद्र्याचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात चार कॉल आणि एक मेसेजची देवाणघेवाणही झाली. (हेही वाचा: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, मॅनेजरसह इतरांविरुद्ध FIR दाखल केला)
दरम्यान, पटना पोलिसांनी रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.