Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Moving Out Of Mannat: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'मन्नत' (Mannat) हा मुंबईतील बांद्रा (पश्चिम) येथील बँडस्टँडसमोर स्थित एक भव्य आणि आलिशान बंगला आहे. सुमारे 27,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा सहा मजली बंगला पारंपारिक आणि आधुनिक वास्तुकलेचे सुंदर मिश्रण आहे. 'मन्नत' हे मुंबईतील एक प्रसिद्ध स्थळ म्हणूनही ओळखले जाते, जेथे दररोज अनेक पर्यटक आणि चाहत्यांची गर्दी असते. शाहरुख खानने 2001 साली या बंगल्याची खरेदी केल्यानंतर त्याचे नाव 'मन्नत' ठेवले, कारण हे घर त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते. अभिनेता गेल्या 25 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह येथे राहत आहे. पण या वर्षाच्या अखेरीस, खान कुटुंब त्यांचे घर मन्नत सोडून एका अपार्टमेंट इमारतीत राहायला सुरुवात करणार आहे.

मीडिया सूत्रांनी सांगितले की, मन्नत येथील नूतनीकरणाचे काम मे महिन्यात सुरू होणार आहे. यामध्ये बंगल्यामधील दीर्घकाळ प्रलंबित कामाचाही समावेश आहे, ज्यासाठी शाहरुखला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. मन्नत ही ग्रेड III वारसा रचना आहे आणि यामध्ये कोणतेही संरचनात्मक बदल करण्यासाठी योग्य परवानग्या घेणे आवश्यक आहे. आता या परवानग्या मिळाल्यानंतर, काही महिन्यांत नूतनीकरण सुरू होणार असल्याने, शाहरुख आणि त्याचे कुटुंब काही काळ नवीन पत्त्यावर स्थलांतरित होतील.

माहितीनुसार, शाहरुख त्याची पत्नी गौरी आणि मुले आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत वांद्र्याच्या पाली हिल परिसरातील एका आलिशान अपार्टमेंट इमारतीच्या चार मजल्यांमध्ये राहायला जात आहे. मन्नतचे नूतनीकरण एक मोठे काम असण्याची अपेक्षा आहे, कदाचित ते दोन वर्षांपर्यंत चालेल. त्यामुळे रोपर्यंत खान कुटुंब पाली हिल परिसरातील एका उच्चभ्रू निवासस्थानी स्थलांतरित होणार आहे, जेणेकरून ते त्यांच्या मूळ घराच्याजवळ राहतील. (हेही वाचा: Pathaan 2: YRF ने पठाण 2 ची स्क्रिप्ट केली फायनल, चित्रीकरणाला लवकरच करणार सुरुवात)

माहितीनुसार, शाहरुखने हे मजले चित्रपट निर्माते वाशु भगनानी यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतले आहेत. शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने भगनानी यांचा अभिनेता मुलगा जॅकी भगनानी आणि त्यांची मुलगी दीपशिखा देशमुख यांच्यासोबत करार केला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, या चार मजल्यांमध्ये केवळ खान कुटुंबच नाही तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचारी देखील राहतील आणि काही कार्यालयीन जागा देखील असेल. बातम्यांमध्ये असेही म्हटले जात आहे की, किंग खानला या चार मजल्यांसाठी दरमहा 24 लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे.