Saif Ali Khan | (Photo credit: archived, edited, representative image)

Saif Ali Khan Niva Bupa Insurance: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर लीलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन बरा होत आहे. त्याची प्रकृती सुधारत असून, लवकरच त्याला डिस्चार्जही मिळणार आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या डिस्चार्ज आणि त्याने वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या एकूण खर्चाबाबत निवा बुपा विमा (Niva Bupa Insurance) कंपनीकडे दाखल केलेल्या वैद्यकीय विमा दाव्याची आकडेवारी यांचा तपशील पुढे आला आहे. ही माहिती ऑनलाईन लीक (Saif Ali Khan Privacy Breach) झाल्याने अभिनेत्याच्या सुरक्षा, गोपनीयता आणि इतर बाबींबाबत चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्याने केलेल्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम देखील लाखो रुपयांचा असल्याचे समजते. अज्ञात इसमाने घरात घुसुन त्याच्यावर चाकूहल्ला केल्याने जखमी झाल्यावर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात अभिनेत्यास खोलवर जखमा झाल्या होत्या. दरम्यान, त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेल्थ इन्शुरन्स क्लेम किती?

अभिनेता सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचारांच्या खर्चाबाबत सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्याचा सदस्य आयडी, निदान, खोली श्रेणी आणि डिस्चार्जची तारीख उघड करणारे संवेदनशील विमा दस्तऐवज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. लीक झालेल्या नोंदींमध्ये असेही उघड झाले आहे की सैफने त्याच्या उपचारांसाठी 35.95 लाख रुपये मिळावेत असा दावा विमा कंपनीकडे केला होता, ज्यापैकी 25 लाख रुपये निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सने आधीच मंजूर केले आहेत. ही माहिती ऑनलाईन लीक झाल्यानंतर वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेबाबत व्यापक टीका होत आहे. (हेही वाचा, Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानच्या चाहत्यांना मोठा दिलासा, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अभिनेत्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये आले हलवण्यात)

निवा बुपा कंपनीचे निवेदन

अभिनेता सैफ अली खान याचा वैयक्तीक डेटा लीक झाल्यानंतर निवा बुपा कंपनीनेने निवेदन जारी करत निषेध करणारे आणि अभिनेत्याच्या कुटुंबाला पाठिंबा देणारे निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, अभिनेता सैफ अली खानसोबत अलिकडेच घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही त्यांना जलद आणि सुरक्षित पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो. खान आमच्या पॉलिसीधारकांपैकी एक आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आम्हाला कॅशलेस प्री-ऑथोरायझेशन विनंती पाठवण्यात आली होती आणि आम्ही उपचार सुरू करण्यासाठी प्रारंभिक रक्कम मंजूर केली आहे. उपचारानंतर अंतिम बिल मिळाल्यानंतर, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार ते निकाली काढले जातील. या कठीण काळात आम्ही खान आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत. (हेही वाचा, Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने मागितले होते 1 कोटी रुपये; कर्मचारी नर्सने कथन केली त्यावेळी घडलेली धक्कादायक घटना)

पोलिस तपास सुरू

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी चाकूहल्ल्याच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की गुन्हेगाराची ओळख पटवण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले:

"पोलिस तपास सुरू आहे... त्यांना अनेक सुगावे लागले आहेत आणि मला वाटते की पोलिस लवकरच गुन्हेगाराला शोधून काढतील."

अधिकारी सैफच्या वैयक्तिक आरोग्याची माहिती लीक झाल्याच्या परिस्थितीची देखील चौकशी करत आहेत आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकुहल्ला घटनेनंतर त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडमधील अनेकांना जोरदार धक्का बसला आहे. नेकांनी सोशल मीडियावर सैफला पाठिंबा दर्शवला आहे आणि तो लवकर बरा व्हावा अशी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेरही गर्दी केली होती.