S S Rajamouli wins Best Director Award (PC - Twitter/@ssk1122)

S S Rajamouli Wins Best Director Award: एसएस राजामौली (S.S. Rajmauli) यांनी RRR चित्रपटासाठी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल (New York Film Critics Circle) चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार (Best Director Award) जिंकला. त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ आरआरआर चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी एक भाषण केले ज्यामध्ये राजामौली यांनी त्यांचे कुटुंब, चित्रपटाचे कलाकार, क्रू सदस्य आणि ज्युरी यांचे आभार मानले आहेत.

राजामौली म्हणाले की, “तुझ्याकडून हा पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान आहे. याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्या संपूर्ण कलाकारांचा आणि क्रूचा सन्मान केला असून दक्षिण भारतातील एका छोट्या चित्रपटाकडे लक्ष वेधले आहे. अशी जागा अस्तित्वात आहे हे फार लोकांना माहीत नाही, पण त्यामुळे आता मला खात्री आहे की बरेच लोक त्याकडे लक्ष देतील." (हेही वाचा - RRR Movie: 'आरआरआर' ऑस्करच्या शर्यतीत येण्याची शक्यता, 'या' विभागामध्ये चित्रपटाला मिळू शकते नामांकन)

दिग्दर्शक राजामौली पुढे म्हणाले की, "RRR चित्रपट परदेशातही पाहिला गेला. भारतीयांनी ज्या प्रकारे चित्रपटाला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे तो परदेशातही आवडला." हा पुरस्कार स्वीकारताना राजामौली खूप भावूक झाले. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रमा राजामौली आणि मुलगा एसएस कार्तिकेय आणि कुटुंबीय होते. जेव्हा एसएस राजामौली यांच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली तेव्हा तिथे बसलेल्या सर्व परदेशी लोकांनीही आनंदाने उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

राजामौली यांचा मुलगा एस.एस.कार्तिकेयने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पुरस्कार स्विकारत असलेल्या वडील राजामौली आणि आईचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेस्ट डायरेक्टर’. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी राजामौली यांना केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला नाही तर काही दिवसांतचं आरआरआर टीमही गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम 11 जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्लिश मोशन पिक्चर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. याशिवाय, चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'नातू-नातू' ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.