कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटातील कलाकार घाबरले आहेत. चित्रपटांचे शुटींग, कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. अनेक प्रसिद्ध सेलेब्जनी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लोकांना जागरूक राहण्यास सांगितले आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा (Raveena Tandon) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ट्रेनची सीट साफ करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याबरोबरच रवीनाने लोकांना, कोरोनाविरूद्ध सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. रवीना टंडनने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
रवीना टंडन व्हिडिओ-
कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. भारतातील अनेक शहरे जवळजवळ पूर्णपणे बंद झाली आहेत. या लॉकडाऊनमुळे लोक केवळ आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशात रवीना टंडनने रेल्वेमधून प्रवास केला. त्यावेळी तिने स्वतः आपली सीट स्वच्छ केली.
या व्हिडिओसोबत रवीना लिहिले, ‘रेल्वे सुरु होण्यापूर्वी वाइप्सनी सॅनिटायझरसह केबिनचे निर्जंतुकीकरण केले. यामुळे प्रवास अधिक आरामदायक होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीबद्दल पुढे पस्तावण्याआधी सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे. सध्या फक्त आवश्यक असल्यासच प्रवास करा आणि कृपया स्वतःची आणि आपल्या आसपासचे इतर लोक सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्या.’
(हेही वाचा: कोरोनाग्रस्त गायिका कनिका कपूर विरोधात गुन्हा दाखल; धोकादायक आजार पसरवल्याचा आरोप)
रविनाने मागच्या आठवड्यामध्ये कामानिमित्त रेल्वेने प्रवास केला होता. रवीनाचे हे शूट इनडोअर होते. त्यानंतर ती सुखरूप परत आली व तिने स्वतःला 31 मार्चपर्यंत इतरांपासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत 258 लोकांना या धोकादायक कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली. शुक्रवारी, 63 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली. कोरोनामुळे आतापर्यंत देशात चार लोकांचा मृत्यू झाला आहे.