श्रवण डॅनियल (संग्रहित संपादित प्रतिमा)

निर्भया हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता, त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हैदराबाद (Hyderabad) येथे 27 वर्षीय डॉक्टर युवतीवर बलात्कार (Rape) करून तिला जाळण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने देशात संतापाची लाट पसरली आहे. त्या नराधमांना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी होत असताना, प्रसिद्ध दिग्दर्शक डॅनियल श्रवण (Daniel Shravan) याने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. ‘स्त्रियांनी बलात्कार करणाऱ्या व्यक्तिला साथ दिली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी नेहमी स्वतःजवळ कंडोम (Condom) बाळगले पाहिजे’ असे वादग्रस्त विधान श्रवणने केले आहे. या वक्त्यव्यामुळे श्रवण टीकेचा धनी झाला असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल मिडीयावर जोर धरू लागली आहे.

श्रवणने सोशल मिडीयावर मांडलेले आपले विचार - 

27 नोव्हेंबर रोजी ही युवती घरी परतत असताना तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकले. त्यानंतर सोशल मिडीयावर या घटनेबाबत संताप व्यक्त व्हायला सुरुवात झाली. जनता, राजकारणी, सेलेब्ज अशा सर्वांनी बलात्कार करणाऱ्या व्यक्तिला कठोर कारकाई करावी अशी मागणी केली. इतकेच नाही तर हा बलात्कार करणाऱ्या युवकाच्या कुटुंबानेही आपल्या मुलाला जाळून टाका असे सांगितले. मात्र श्रवण डॅनियलने सोशल मिडीयावर आपले विचार व्यक्त करताना लिहिले, ‘सरकारने बलात्कार ही घटना कायदेशीर करावी. निर्भया कायद्याद्वारे कोणताही न्याय होणार नाही. बलात्काराचा अजेंडा म्हणजे त्यांच्या लैंगिक गरजा या वेळ आणि मनस्थितीनुसार पूर्ण करणे होय. जर समाज, न्यायालये आणि महिला संघटनांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, तर ती व्यक्ती एक पाऊल पुढे जाऊन बलात्कार झाल्यावर महिलांना ठार मारते. 18 वर्षांवरील मुलींना बलात्काराबद्दल जागरूक केले पाहिजे. म्हणजेच स्त्रिया किंवा मुलींनी पुरुषांच्या लैंगिक गरजांकडे दुर्लक्ष करू नये, तरच अशा गोष्टी थांबतील. वीरप्पनला मारून तस्करी थांबेल का? किंवा लादेनला मारल्यास दहशतवाद संपेल? हे मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे निर्भया कायद्याच्या मदतीने बलात्कार रोखता येणार नाही.

महिलांनी आपल्यासोबत नेहमी कंडोम बाळगले पहिले. महिलांची सुरक्षा 100 नंबर फोन नाही तर कंडोम करेल. बलात्कार होताना महिलांनी त्या व्यक्तीस साथ दिली पाहिजे जेणेकरून तो त्यांना ठार मारणार नाही.’ (हेही वाचा: Hyderabad Rape And Murder Case: नातेवाईकांनी 100 नंबरवर फोन लावता पोलीस म्हणाले 'पहिले आधार कार्ड क्रमांक सांगा')

श्रवणच्या या पोस्टवर अनेकांनी टीका केली. श्रवणला शिक्षा व्हावी अशी मागणीही केली. मात्र त्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट व्हायरल होत आहे हे ध्यानात आल्यावर त्याने अजून एक पोस्ट करत, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण पोस्ट केलेले विचार हे आपले स्वतःचे नसून आपल्या नवीन चित्रपटातील खलनायकाच्या तोंडचे संवाद असल्याचे त्याने सांगितले.